
राहू (प्रतिनिधी)
दौंड तालुक्यातील राहु येथे बिबट्याच्या हल्ल्यात दोन घाबण शेळ्यांचा मृत्यू झाला असून एक शेळी गंभीर जखमी झाल्याची घटना घडली आहे. या घटनेमुळे परिसरातील शेतकरी व नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, राहु येथील शेतकरी शरद रामदास नवले यांच्या घराशेजारी असलेल्या गोठ्यात रात्रीच्या सुमारास बिबट्याने प्रवेश करून तीन शेळ्यांवर हल्ला केला. या हल्ल्यात दोन घाबण शेळ्यांचा जागीच मृत्यू झाला, तर एक शेळी गंभीर जखमी झाली आहे.
या घटनेची माहिती मिळताच परिसरातील ग्रामस्थांनी घटनास्थळी धाव घेतली. या हल्ल्यामुळे शेतकरी नवले यांचे मोठे आर्थिक नुकसान झाले आहे. याचा वन विभागाने तातडीने पंचनामा केला आहे.
येथे लवकरात लवकर पिंजरा बसवण्याची मागणी शेतकऱ्यांनी केली आहे.
