राहू (प्रतिनिधी) दौंड तालुक्यातील राहू परिसरातील आरोग्य विभागात कार्यरत असलेल्या एका महिला कर्मचाऱ्याशी एका पुरुष कर्मचाऱ्याने असभ्य वर्तन केल्याची चर्चा सुरू आहे. या घटनेनंतर संबंधित महिला कर्मचाऱ्याने नाराजी व्यक्त केल्याचे सांगितले जात आहे. मात्र अद्याप कोणतीही अधिकृत तक्रार दाखल नसल्याची माहिती समोर येत आहे.संबंधित युवती प्रशिक्षणासाठी आरोग्य विभागात असताना लिपिकाने तिच्याशी अनावश्यक जवळीक साधण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप आहे. युवतीने त्यास विरोध केल्यानंतर संबंधित कर्मचारी आपल्या कक्षात निघून गेला. मात्र, सायंकाळी काम संपल्यानंतर युवती बसची वाट पाहत असताना तो दुचाकीवर तेथे आला व “चल, तुला गाडीवर सोडतो,” अशी ऑफर दिल्याचे सांगितले जाते. युवतीने त्यालाही स्पष्ट नकार दिला.बदनामीच्या भीतीने युवतीने सुरुवातीला हा प्रकार कोणाकडेही सांगितला नाही. मात्र, तिने आपल्या बहिणीला घडलेला प्रकार सांगितल्यानंतर बहिणीने संबंधित कर्मचाऱ्याशी दूरध्वनीवर संपर्क साधून त्याला जाब विचारल्याचे समजते. अशा नराधमांना अनेकदा पाठीशी घातल्यामुळे महिलांवरील अन्याय अत्याचार वाढत चालले असून राजकीय नेत्यांनी देखील याचे भान ठेवणे आवश्यक आहे.त्यामुळे या प्रकरणाची सखोल चौकशी होणार का, तसेच संबंधितांवर कोणती प्रशासकीय कारवाई होणार, याकडे नागरिकांचे लक्ष लागले आहे.
*जिल्हा पातळीवर गेलेल्या एका राजकीय पुढाऱ्याने हस्तक्षेप करून संबंधित प्रकरण जागीच मिटविल्याचा आरोप केला जात आहे. यावेळी संबंधित कर्मचाऱ्याने संबंधित महिला कर्मचाऱ्यांची जाहीर माफी मागितली आहे. संबंधित नेत्याच्या हाती सूत्र असताना त्यांनी संबंधित कर्मचाऱ्यांच्या ‘पेटपर’ कारवाईची मागणी करणे अपेक्षित होते.*
