
राहू ( प्रतिनिधी )
दौंड तालुक्यातील लडकतवाडी आणि उंडवडी परिसरातील गावांच्या शिवेवर लागलेल्या भीषण आगीत तब्बल ५० एकरांवरील ऊस जळून खाक झाल्याची घटना घडली आहे. या आगीमुळे परिसरातील शेतकऱ्यांचे मोठे आर्थिक नुकसान झाले असून हातातोंडाशी आलेले उसाचे पीक डोळ्यादेखत जळताना पाहण्याची दुर्दैवी वेळ शेतकऱ्यांवर आली.मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, लडकतवाडी येथील एका शेतकऱ्याने ऊसतोड झाल्यानंतर शेतातील पाचट पेटवून दिले होते.पाचट विझे पर्यत ते तेथेच होते.मात्र काही वेळाने या आगीने अचानक रौद्ररूप धारण केले. वाऱ्यामुळे आगीचा फैलाव वेगाने होत आजूबाजूच्या शेतांमधील उभ्या उसाच्या पिकाला आग लागली. पाहता पाहता आगीने मोठे क्षेत्र आपल्या कवेत घेतले. यामध्ये लडकतवाडी आणि उंडवडी गावांच्या शिवेवरील सुमारे ५० एकर ऊस जळून खाक झाला.या घटनेमुळे बाधित शेतकऱ्यांचे मोठे आर्थिक नुकसान झाले आहे. आधीच शेतीमालाच्या उत्पादन खर्चाने शेतकरी अडचणीत असताना या आगीच्या घटनेने त्यांच्या संकटात आणखी भर पडली आहे.संबंधित प्रशासनाने तातडीने घटनास्थळी पाहणी करून जळालेल्या उसाचे पंचनामे करावेत आणि नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना शासनाकडून आर्थिक मदत मिळवून द्यावी, अशी मागणी परिसरातील शेतकऱ्यांकडून होत आहे.
शेकडो एकर ऊस वाचवीण्यात यश…
लडकतवाडी व उंडवडी शिवेवर ऊसाला आग लागली ही बातमी वाऱ्यासारखी उंडवडी व लडकतवाडी परिसरात पसरली. त्यामुळे हातातील काम टाकून तरुणांनी या भागाकडे धाव घेतली. परिसरात असणारा शेकडो एकर ऊस वाचवण्यासाठी परिसरातील अनेक तरुण सहभागी झाले.तरुणांनी केलेल्या शर्तीच्या प्रयत्नामुळे अनेक आणखी शंभर एकर ऊस पेटण्यापासून वाचवण्यात तरुणांना यश आले.– योगेश लडकत (शेतकरी)
लडकतवाडी उंडवडी परिसरामध्ये झालेल्या अग्नि तांडवामुळे ५० एकर हुन अधिक ऊस जळून खाक झाला आहे. यामुळे शेतकऱ्यांचे मोठे आर्थिक नुकसान झाले आहे. काही शेतकऱ्यांचा ऊस तोडणीला आला होता तर काही शेतकऱ्यांचा ऊस लहान होता. तालुक्यातील भीमा पाटस व श्रीनाथ म्हस्कोबा साखर कारखान्याने तातडीने ऊस तोडून नेण्यासाठी तत्परता दाखवली आहे.– रामभाऊ दोरगे (शेतकरी)
